पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवित आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग यश संपादन करून ऋचा दरेकर या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणीने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऋचा हिचा शनिवारी (दि. 12) सत्कार करण्यात आला.
ऋचा दरेकरने पनवेलवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात तिचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऋचाचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अॅड. संजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, विजया कदम यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.