माणगाव उपजिल्हा रुग्णालयात बसावे लागते ताटकळत
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर वेळेत आपले काम सुरु करीत नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणार्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्यांची वाट पाहात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचार घेण्याऐवजी खाजगी दवाखान्याचा रस्ता पकडत आहेत. येथील कामचुकार डॉक्टरांवर कारवाई करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून विविध सोयी,सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र डॉक्टरांची काही तर कर्मचार्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तात्पुरत्या स्वरूपात काही डॉक्टर अर्धवेळ तर काही पुर्णवेळ काम करतात. या डॉक्टरांचे आठवड्यातील वार ठरलेले आहेत. त्यांच्या वॉर्डबाहेर फलकावर आठवड्याचे दिवस लिहिले आहेत, मात्र वेळा लहिलेल्या नाहीत तसेच संबंधित डॉक्टरांचे संपर्कासाठी मोबाइल नंबर लिहिणे गरजेचे आहे, जेणे करून एखाद्या रुग्णाला संबंधित डॉक्टरांकडे संपर्क करता येईल तसेच त्या डॉक्टरांची वेळ पाहून उपचारासाठी येणे सोयीस्कर होईल. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर मर्जीप्रमाणे रुग्णालयात येऊन काम करतात. तर काही डॉक्टर वेळेपूर्वीच निघून जातात. याठिकाणी काम करणार्या काही डॉक्टरांना राजकीय वरदहस्त असल्याने ते मर्जीप्रमाणे वागत आहेत. या बाबत रुग्णांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. गोमसाळे यांच्याकडे संपर्क साधला असता, त्यांनी अशा कामचुकार डॉक्टरांना समज देवून वेळेनुसार रुग्णालयात काम पाहावे, अशा सूचना देणार असल्याचे सांगितले.