कर्जत : बातमीदार
माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या पेब किल्ला अर्थात विकटगड येथे डोंबिवली येथील 12 ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. सायंकाळी परत येताना कोसळलेल्या दरडीमुळे ते ट्रेकर्स रस्ता भरकटले. माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमने पाऊस सुरू असताना अंधार्या रात्रीत तीन तास शोध घेत या ट्रेकर्सना माथेरान घाट रस्त्यावर आणले.
डोंबिवली येथील नऊ तरुणी व तीन तरुण असा एकुण 12 जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी पेब किल्ला येथे आला होता. सकाळी ते नेरळ फणसवाडी येथून किल्ल्यावर पोहचले. मात्र मिनिट्रेनच्या ट्रॅकने परत येताना अंधार पडला होता. मोबाइलमधील बॅटरीच्या उजेडात चालत असताना रेल्वे मार्गात कोसळलेल्या दरडीमुळे रस्ता बंद झाल्याने हे ट्रेकर्स घाबरून गेले. ही माहिती माथेरान पोलीस ठाण्याला मिळताच त्यांनी सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांसह मिनिट्रेनच्या मार्गाने शोध मोहीम सुरू केली.
माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, चेतन कळंबे, सुनिल ढोले, महेश काळे, दिनेश सुतार चिखल तसेच मोठमोठ्या दगडांवरून मार्ग काढत या रस्ता चुकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास त्या 12 जणांच्या ग्रुपला माथेरान घाट रस्त्यात सुखरूप आणले.