खालापूर : प्रतिनिधी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणात सीआयडीने मेटे यांच्या वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात कलम 304 (2) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मराठा आरक्षणासाठी 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे 5च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. यात मेटे यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेचा सीआयडीकडून तपास सुरू होता. तपासात विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही मते घेतली गेली. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता.
सीआयडीने केलेल्या सीसीटीव्ही तपासणीत विनायक मेटेंचा चालक एकनाथ कदमने ताशी 130-140 किलोमीटर वेगाने गाडी चालविल्याचे समोर आले आहे. याशिवाय गाडीचा अपघात होण्याआधी चालकाने दुसरी गाडी ओव्हरटेक करीत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. जागा नसतानाही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाला, असेही या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने लवकरच सीआयडी आरोपी चालक एकनाथ कदमला अटक करण्याची शक्यता आहे.
Check Also
उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …
RamPrahar – The Panvel Daily Paper