Breaking News

रेल्वे स्टेशन परिसरात चोरांचा सुळसुळाट

पनवेलसह नवी मुंबईत दररोज वाहनचोरीच्या घटना

नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त

रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेवर स्वत:चे वाहने उभे करून झटपट लोकल पकडण्यासाठी अनेक नोकरवर्गाची धावपळ पहायला मिळते, मात्र मुंबईतून पुन्हा परतल्यावर स्वत:चे वाहन उभे केलेल्या ठिकाणी नसल्याचे पाहिल्यावर वाहनाची शोधाशोध सुरू होते. अखेर सर्वत्र शोधल्यानंतर वाहन मिळत नसल्याची खात्री झाल्यावर पोलीस ठाण्यात जाऊन वाहन चोरीची नोंद करण्यासाठी नवा प्रवास सुरू होतो, मात्र सध्या हार्बर व पनवेल ठाणे महामार्गावरील रेल्वेस्थानके वाहनचोरांसाठी हक्काचे ठिकाण बनल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. बुधवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांसमोरुन दुचाकी चोरी झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. पे अ‍ॅण्ड पार्कचे शुल्क वाचविण्यासाठी किंवा लोकल सुटू नये म्हणून मिळेल त्या जागेवर वाहने उभी करणे बुधवारी अनेक वाहनमालकांना महाग पडले आहे. ऐरोली स्थानकासमोरील रस्त्यावर गेल्या आठवड्यात शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता कुलदीप कालेकर यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती. सायंकाळी पावणेसात वाजता कालेकर तेथे आल्यावर दुचाकी तेथे नव्हती. तसेच नवीन पनवेल येथे राहणारे पंकज गव्हाणे यांनी मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांची दुचाकी खांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील पदपथावर उभी केली होती. दुपारी साडेचार वाजता पंजक यांना त्यांची दुचाकी तेथून चोरट्याने चोरल्याची दिसले. तिसर्‍या घटनेत मंगळवारी पनवेल रेल्वेस्थानकाच्या रिक्षा थांब्याच्या बाजूला मोकळ्या जागेत शशिकांत पाटील यांनी त्यांची दुचाकी सकाळी साडेसात वाजता उभी केली, मात्र रात्री साडेआठ वाजता ती दुचाकी तिथे नव्हती. या तीनही घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली असून पनवेल, नवी मुंबई रेल्वेस्थानकांसमोरील मोकळ्या जागेतील उभ्या वाहनांची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. खांदेश्वर व मानसरोवर अशा रेल्वेस्थानकांसमोर वाहनतळ तात्पुरत्या स्वरुपात सिडकोने उपलब्ध करून दिले आहे, मात्र तेथे वाहनमालक दुचाकी उभ्या करत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. वारंवार वाहनचोरी होत असल्याने पोलिसांसमोर दुचाकी चोरांची मोठी टोळी पकडण्याचे आव्हान आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply