उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे मत
अलिबाग : प्रतिनिधी
वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर 90 टक्के अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल. शुन्य अपघाताचे उद्दीष्टही साध्य करता येईल, असा विश्वास पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी व्यक्त केला. रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या स्मरण दिनाचे औचित्यसाधून अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देवकाते बोलत होते. वाहन, चालक, रस्ते आणि स्थानिक परिस्थिती या चार कारणांमुळे अपघात होतात. त्यामुळे वाहन चालवताना सतर्कता बाळगली, वाहतूक नियमांचे पालन केले. सुरक्षितेचे निकष बाळगले तर अपघात रोखता येऊ शकतात, असे त्यांनी या वेळी सांगितले. जानेवारी महिन्यापासून गेल्या 11 महिन्यात जिल्ह्यात 500 अपघातांची नोंद झाली आहे. त्यात 184 जणांचा मृत्यू झाला. तर 600 जणजखमी झालेत. यावरुन अपघातांची दाहकता लक्षात येते. त्यामुळे वाहन चालवतांना जबाबदारी पाळली पाहिजे, रस्त्याची वाहन संस्कृती पाळली पाहिजे असे मत या वेळी पोलीस निरीक्षक शशिकांत तिरसे यांनी व्यक्त केले. अपघातात जेव्हा एखाद्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण कुटूंबाला भोगावे लागतात. त्यामुळे वाहने चालवताना काळजी घ्यायला हवी. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करायला हवी, असे मत माणुसकी प्रतिष्ठानचे राजाराम हुलवान यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी वर्षभरात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथही उपस्थितांना देण्यात आली. अनिस बागवान, विजय चौधरी, दिनेश शर्मा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक या वेळ उपस्थित होते.