एक महिन्यानंतरही माणगाव नगरपंचायतीला मुहूर्त मिळेना
माणगाव : प्रतिनिधी
गेले महिने प्रतीक्षेत असलेले अत्याधुनिक अग्निशमन वाहन माणगावात मोठ्या दिमाखात दाखल झाले आहे. मात्र तब्बल एक महिना लोटला तरीही या वाहनाच्या लोकार्पणाला नगरपंचायतीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे हे अग्निशमन वाहन अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. माणगाव नगरपंचायतीला दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक सोयींनीयुक्त सुसज्ज अग्निशमन वाहन मंजूर झाले होते. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे तीन कोटी 17 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आग विझवणे, पूरग्रस्तस्थितीशी मुकाबला करणे, दरडग्रस्त भागात मदत करणे, पूल व बिल्डिंग कोसळण्यासारख्या दुर्घटनेत या अग्निशमन वाहनाची मदत होणार आहे. त्यासाठी या अत्याधुनिक व सुसज्ज वाहनात 125 विविध प्रकारची यंत्रसामुग्री बसविण्यात आली आहे. अशा प्रकारचे हे रायगड जिल्ह्यात पहिलेच अग्निशमन वाहन आहे. दोन वर्षांची अग्नीपरीक्षा देत हे वाहन दीपावलीपूर्वीच माणगाव नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल झाले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नगरपंचायत लवकर घेणार असल्याची माहिती त्या वेळी मुख्याधिकारी संतोष माळी यांनीदिली होेती.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोयीनुसार या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात येत आहे. तत्पुर्वी एखाद्या दुर्घटनेचा कॉल आल्यास हे अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी पाठवले जाईल. त्यासाठी पुरेशा कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-संतोष माळी, मुख्याधिकारी, माणगाव नगरपंचायत