Breaking News

एमजीएमच्या विद्यार्थ्यांकडून वाहनचालकांमध्ये जनजागृती

पनवेल : वार्ताहर

सध्या कारखान्याबरोबरच स्वयंचलित वाहनांमधूनही मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असून हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कामोठे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी खारघर टोलनाक्यावर वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट व रामके फाऊंडेशननेही या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्याचबरोबर खारघर पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांचे सहकार्य मिळाले.

गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज त्यामध्ये भर पडत असल्याने हवेतील प्रदूषणाचा आलेखही वाढत चालला आहे. त्यामुळे हवा दूषित होऊन अनेक विकारांना बळी पडावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्रात होणार्‍या प्रदूषणाबरोबरच वाहनांमधूनही मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड वायू हवेत सोडला जातो. एकंदरीतच प्रदूषण हे मानवी शरीरास घातक आहे. त्यामध्ये वाढ होऊन मनुष्याच्या आयुर्मानामध्ये घट करण्यासारखे आहे. दरम्यान, वायूप्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी आणि संघटना सरसावल्या आहेत. याशिवाय पर्यावरण विभागाकडून काही कायदेही करण्यात आले आहेत. कायद्याचा बडगा उगारण्याबरोबरच लोकांमध्ये प्रबोधन आणि जागृती होणे गरजेचे असल्याने कामोठे येथील एमजीएम महाविद्यालय आणि मुंबई वेस्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रामके फाऊंडेशन यांच्या वतीने गुरुवारी खारघर टोल नाका येथे जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टोलनाक्यावर वाहने थांबल्यानंतर वाहनचालकांना माहितीपत्रक देऊन त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करा. सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्या, सायकलचा वापर करा, सीएनजी वाहनांमध्ये जास्तीत जास्त प्रवास करा, वाहनांच्या देखभालीकडे लक्ष द्या, जिथे शक्य असेल तिथे पायी चाला, जैविक खाद्यपदार्थांचे कंपोस्टिंग करा, अजैविक वस्तूंचा पुनर्वापर करा, विजेची बचत करा, झाडे लावा झाडे वाचवा, असे आवाहन भावी डॉक्टरांनी वाहनचालकांना केले. या वेळी एमजीएमचे विभाग प्रमुख डॉ. प्रसाद, डॉ. मृणाल, डॉ. माधवी, मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे व्यवस्थापक सतेज डॅनियल यांच्यासह खारघर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply