Breaking News

महाराष्ट्रात लोकाभिमुख सरकार -चित्रा वाघ

खोपोली : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकाभिमुख व सर्वसामान्यांचे सरकार आहे. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत, ही जबाबदारी तुमची व माझी आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 27) खोपोली येथे केले. त्या महिला मेळाव्यात बोलत होत्या.
भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने खोपोलीतील लोहाणा समाज हॉलच्या प्रांगणात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला महिलांची बुलंद तोफ असलेल्या चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती होती. त्याचप्रमाणे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमल, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, खोपोली अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व त्यांचे सहकारी, महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तथा वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या मेळाव्यात चित्रा वाघ म्हणाल्या की, विरोधी पक्षात असताना आपण मोर्चे, आंदोलने केली व पीडितांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपण आता सत्ताधारी पक्षात असल्याने तुमची व माझी जबाबदारी वाढली आहे. सर्व महिला कार्यकर्त्यांनी शासकीय यंत्रणा, अधिकार्‍यांना सोबत घेऊन ज्या ज्या योजना आहेत त्या राबविण्यासाठी झटून प्रयत्न करावेे.
देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र आहेत. भाजपकडे खणखणीत नाणी आहेत. त्यामुळे पक्ष संघटनावाढीसाठी महिलांनीही पुढाकार घ्यावा. प्रत्येक महिला ही आमची भगिनी आहे. अडचणीच्या काळात तिच्या मागे ठाम उभे राहणे पदाधिकार्‍यांचे कर्तव्य आहे. तुम्ही व मी एकत्र येऊन महिलांचे प्रश्न सोडवू यासाठीच पक्षाने मला जबाबदारी दिल्याचे चित्राताई वाघ यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेताना वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाकडून सहकार्य मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. यात त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा आदरपूर्वक उल्लेख केला.
कार्यक्रमापूर्वी चित्रा वाघ यांनी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व खोपोली शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार प्रशांत ठाकूर व पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. यानंतर शिळफाटा येथून बाईक रॅली काढण्यात आली. त्यातही चित्राताई व प्रशांतदादा यांनीही सहभाग घेतला. बाजारपेठेत जागोजागी त्यांचे उस्फूर्तपणे स्वागत करण्यात येत होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत करताना पुष्पवृष्टीही करण्यात आली.

काम करणार्‍यांना नेतृत्वाची संधी मिळणार -आमदार प्रशांत ठाकूर
प्रमुख अतिथी रायगड भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात, मागील सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत आपल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, पण ताई तुमच्या सक्षम नेतृत्वामुळे कुठेही महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या डगमगल्या नाहीत. खोट्या केसेस अंगावर घेऊन पीडितांना न्याय देण्याचे, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे काम आपण महिला मोर्चाच्या माध्यमातून केले. आगामी सर्व निवडणुकांमध्ये महिलांचे संघटन आणखी बळकट करून  काम करणार्‍या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी पक्ष देणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply