Breaking News

पालीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा समर्थकांसह भाजपमध्ये दाखल

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का

मुंबई : प्रतिनिधी
पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता पालरेचा यांनी सोमवारी (दि. 28) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालरेचा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.
मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर आदी उपस्थित होते.
या वेळी गीता पालरेचा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, पाली शहर अध्यक्ष अभिजीत चांदोरकर, संजय घोसाळकर, प्रकाश अवास्कर, नितीन परब, शाम खंडागळे, सुधाकर मोरे, सुशिल शिंदे, मारुती खेरटकर, काही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेतृत्व म्हणून गीता पालरेचा यांची ओळख आहे. त्या पाली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या तसेच नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या होत्या, परंतु त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजप नेतृत्वाच्या वतीने मी त्यांचे पक्षात स्वागत करतो. पालरेचा व त्यांच्या सहकार्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाचे रायगड जिल्ह्यातील बळ वाढले आहे. सुधागड तालुक्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेच्या हिताचे सरकार महाराष्ट्रामध्ये विराजमान झालेले आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यामधील सर्व प्रश्न खर्‍या अर्थाने मार्गी लावण्यासाठी या प्रवाहामध्ये गीता पालरेचा आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी विश्वास दाखवून विकासाच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

गीताताईंनी वेगळा आदर्श निर्माण केला -ना. रवींद्र चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता पालरेचा आणि त्यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे जिल्ह्यामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे. गीता पालरेचा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालीच्या नगराध्यक्षा होत्या, परंतु त्यांनी आपल्या पक्षाचा व पदाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. एखाद्या पदावर व्यक्ती विराजमान असताना ती पदाच्या लालसेपाटी त्या ठिकाणी चिकटून राहते, परंतु गीताताईंनी सर्वच कार्यकर्त्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत मंत्री चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले.

सुधागड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय वलय असणार्‍या गीता पालरेचा भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने निश्चितच रायगड जिल्ह्यात पक्षाला बळकटी प्राप्त होणार आहे. पाली नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. समाजातील विविध क्षेत्रांत त्यांचे कुटूंब अग्रभागी असल्याने त्याचा निश्चितच फायदा भाजपसाठी भविष्यात दिसून येईल.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply