Tuesday , February 7 2023

युवा राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत रायगडचा संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी
बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाशी सलग्न महा बास्केटबॉल संघटनेच्या मान्यतेने, हेल्दी स्पोर्ट्स अकादमी व धुळे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने 16 वर्षाआतील युथ राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच धुळे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेत 36 जिल्ह्यांतून मुला-मुलींचे मिळून 60 संघ, खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक असे 600 ते 700 जण सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरुवात जिल्हाधिकारी जलज शर्मा व महाबास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष धनंजय वेरूळकर यांच्या हस्ते झाली. उद्घाटन समारंभास डीडीसी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, महाबास्केटबॉल संघटनेचे सचिव शत्रुघ्न गोखले, खजिनदार जयवंत देशमुख आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत रायगडच्या मुलांच्या संघाने वाशीम, लातूर, अहमदनगर, अमरावती यांना मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. रायगड आणि सातारा यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात रायगडने सातारा संघाला अंतिम सामन्यात 74-65 असे नऊ गुणांनी हरवून विजेतेपद पटकाविले. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानही रायगडच्या योगेश यादवने मिळविला.
रायगडच्या संघात वरुण अडागळे, पार्थ बिचकर, जीत पाटील, ओमशिक शेट्टी, वंश मित्तल, आर्यन लखानी, झैन लखानी, झेफन स्कॉट, योगेश यादव, सुरज गुप्ता, ऋषिराज बोयापल्ली, सौमित्र गोकराल, मुख्य संघ प्रशिक्षक  ब्रँडन वॉकर, सहाय्यक प्रशिक्षक भरत गुरव, अक्षय राणा, फिजिओथेरपिस्ट पंखुरी आशिरगडे, व्यवस्थापक अनिल जॉन बेबी यांचा समावेश होता. या  राज्यस्तरीय स्पर्धेतून निवडलेले खेळाडू इंदोर (मध्य प्रदेश) येथे होणार्‍या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील. रायगडच्या संघाचे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव संदीप प्रल्हाद गुरव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply