Breaking News

खालापुरात महाविकास आघाडीत फूट

माडप ग्रामपंचायत निवडणुकीत परस्परविरोधी अर्ज दाखल
खोपोली : प्रतिनिधी
माडप ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने परिवर्तन आघाडी तयार करत उमेदवार दिल्याने खालापूर तालुक्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लागला आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीत दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड आणि खालापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने काही दिवसापूर्वी आम्ही एकत्र निवडणुका लढवू असे जाहीर केले होते. परंतु माडप ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काल-परवापर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे राजकिय मित्र रातोरात वैरी झाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दिसत असून, कार्यकर्त्यांना कोणता झेंडा घेवू हाती असा प्रश्न पडला आहे.
माडप ग्रामपंचायतीसाठी माजी सरपंच अर्चना पाटील पुन्हा थेट सरपंचासाठी उभ्या राहिला आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. तर अर्चना पाटील यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने परिवर्तन आघाडी तयार करत थेट सरपंच पदासाठी गुरुवारी (दि. 1) रेश्मा सतीश घोडविंदे यांचा अर्ज दाखल केला. या वेळी माजी पंचायत समिती उपसभापती एस. एम. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत परिवर्तन आघाडीतून सर्वसामान्यांचा उमेदवार दिल्याचे सांगितले.
दरम्यान, माडप ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच तालुकाप्रमुख संदेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

माथेरानमध्ये नव्याने दाखल होणार्‍या ई-रिक्षा हातरिक्षाचालकांना मिळतील -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत ः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलावर्गाच्या सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे महिलाशक्तीला …

Leave a Reply