आमदार प्रशांत ठाकूर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघरला दारूमुक्त शहराचा अधिकृत दर्जा देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा या मागणीसाठी संघर्ष समितीने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. दारूबंदीसाठी आग्रही असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा विषय हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्वासन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले. खारघर शहरातील हॉटेल निरसूख पॅलेसला दारूविक्रीचा परवाना मिळाला आहे. शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे तसेच शांत व शिस्तप्रिय खारघर हे दारूमुक्त असावे, अशी भाजपची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे. या मुद्द्यावरून नुकताच सर्वपक्षीय बंदही पुकारण्यात आला होता. स्थापनेपासून खारघरची ओळख नो लिकर झोन असल्याने या शहराला अधिकृतपणे दारूमुक्त शहराचा दर्जा देण्यात यावा याकरिता संघर्ष समिती प्रयत्नशील आहे. या दृष्टीने संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मद्यविक्रीविरोधात असलेले कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेत निवेदन दिले. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात ब्रिजेश पटेल, विजय पाटील, केसरीनाथ पाटील, बिना गोगरी, बळीराम नेटके, प्रवीण पाटील, रमेश मेनन, मनोज शारबिद्रे, किर्ती मेहरा, राजश्री कदम, अक्षय नाईक, विश्वनाथ चौधरी, संध्या शारबिद्रे, त्रिवेणी शालकर आदी सर्वपक्षीय पदाधिकार्यांचा समावेश होता. खारघर शहराला दारूमुक्त शहराचा दर्जा द्यावा ही नागरिकांची जुनी मागणी आहे.भाजपचा या मागणीला पाठिंबा आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या हिवाळी अधिवेशनात हा विषय उपस्थित करणार असून उत्पादन शुल्कमंत्र्याकडेदेखील याबाबत बैठकीची मागणी करणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.