Breaking News

माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळांचा पुन्हा थरार

पालिकेच्या प्रस्तावावर मॉनिटरिंग कमिटी सकारात्मक

कर्जत : विजय मांडे
व्हॅली क्रॉसिंगचा समावेश शासनाने साहसी खेळ प्रकारात केला असून  माथेरानमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळांचा पुन्हा थरार सुरू होण्याची चिन्हे आहेत. याकरिता माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने मागितलेल्या परवानगीच्या प्रस्तावावर इको सेन्सेटिव्ह झोनच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ यांचे पर्यटन सुरू व्हावे यासाठी माथेरानकर आग्रही होते. त्या वेळी माथेरानमधील तरुणांना जंगलाची पूर्ण माहिती असल्याने तरुणांनी सुरू केलेल्या झिप लाईन म्हणजे व्हॅली क्रॉसिंग व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळू लागला, मात्र माथेरानच्या जंगलावर मालकी असलेल्या वन विभागाने व्हॅली क्रॉसिंगचे सर्व दोर मोठा बंदोबस्त मागवून तोडून टाकले आणि हा व्यवसाय बंद झाला. व
दरम्यान, जुलै 2021मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पर्यटनवाढीसाठी साहसी खेळांना मान्यता देण्यात आली. माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंगसारखे साहसी खेळ हे पर्यटकांच्या आवडीचे केंद्र बनले होते. त्यामुळे हे साहसी खेळ पुन्हा सुरू व्हावेत यासाठी माथेरान पालिका आग्रही होती. त्यानंतर शासनाने निर्णय घेऊन परवानगी दिली आहे असल्याने वन विभागाने घातलेली बंदी उठवावी आणि व्हॅली क्रॉसिंगचा समावेश साहसी खेळामध्ये माथेरान पर्यटनस्थळी व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले.
राज्य सरकारने माथेरान पालिकेला सनियंत्रण समितीकडे प्रस्ताव सादर करायला सांगितले होते. त्या प्रस्तावावर दोन दिवसांपूर्वी अलिबाग येथे झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. माथेरानमधील स्थानिकांच्या वतीने पालिकेकडून मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी बाजू मांडली. शासन स्वतः साहसी खेळामध्ये व्हॅली क्रॉसिंगचा समावेश करीत असल्याने सुरक्षेची काळजी घेऊन या व्यवसायाला मान्यता देण्याचा पालिकेच्या प्रस्तावावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी आणि समितीच्या सदस्य सुरेखा भणगे यांनी दिली, मात्र अद्याप त्यावर सनियंत्रण समितीने निर्णय घेतला नसल्याचेदेखील भणगे यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply