-समाधान पाटील, पनवेल
गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विक्रमी विजय मिळवित नवा इतिहास रचला आहे. मोदी लाटेत नव्हे; तर त्सुनामीत काँग्रेस, आम आदमी पक्ष अक्षरशः वाहून गेले. गुजरात म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे गुजरात हे समीकरण या निमित्ताने ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपने याही वेळी विजयाची परंपरा कायम राखली. विशेष म्हणजे या निकालाला विक्रमाची झालर लाभली. यंदाच्या निवडणुकीत एकूण 182 जागांपैकी 156 जागी ‘कमळ’ फुलले. यासह भाजपने काँग्रेसचा 149 जागांचा विक्रम मोडीत काढला. 1985मध्ये माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री असताना काँग्रेसने हे यश प्राप्त केले होते. भाजपने त्याहून सात जागा अधिक जिंकत नवा विक्रम नोंदविला. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या सात कार्यकाळांच्या विक्रमाशी भाजपने बरोबरी केली आहे.
गुजरात ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मभूमी असल्याने साहजिकच या निवडणुकीला विशेष महत्त्व होते. यंदा गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा पारंपरिक सामना होताच, शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने हवा केली होती. या व्यतिरिक्त एमआयएमनेही नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे विरोधकांचे काहीएक चालले नाही. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा दारूण पराभव झाला. गेल्या वेळी 77 जागा जिंकलेल्या काँग्रेसला या वेळी केवळ 17 जागा मिळाल्या. हा पक्षाचा आतापर्यंतचा नीचांक ठरला. आपही प्रभाव पाडू शकला नाही. त्यांची मजल पाच जागांपुरती मर्यादित राहिली, तर ओवेसी बंधूंच्या एमआयएमला खातेही खोलता आले नाही. तीन जागा अपक्षांना आणि एक समाजवादी पक्षाला मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनिती, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यांचा परिपाक म्हणजे भाजपला गुजरातमध्ये अभूतपूर्व यश मिळाले, हे आवर्जून नमूद करावे लागेल.
आगामी लोकसभा निवडणूक 2024मध्ये होणार आहे. चालू वर्ष सरायला काहीच दिवस उरले आहेत. नव्या वर्षापासून लोकसभा रणसंग्रामाची चाचपणी सुरू होईल. या पार्श्वभूमीवर भाजपने घरच्या मैदानावर बाजी मारून सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपचा हा देदीप्यमान विजय विरोधकांना चिंतन करायला लावणारा आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे योगदान
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपच्या ज्या नेत्यांवर वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी टाकण्यात आली होती त्यात पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचाही समावेश होता. पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी चोख बजावत त्यांनी नवसारी जिल्ह्यातील गणदेवी विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार तथा मंत्री नरेशभाई पटेल यांच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
एकीकडे पनवेलमध्ये स्थानिक पातळीवरील निवडणुका होत असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षनेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून गुजरातमधील गणदेवी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. निवडक सहकार्यांसह पनवेल येथून गुजरातमध्ये सातत्याने जात त्यांनी भाजप उमेदवार नरेशभाई पटेल यांचा नियोजनबद्ध प्रचार केला. मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुजरातला मिळवून दिलेली नवी ओळख ते पंतप्रधानपदावर विराजमान होऊन देशाला कशी प्रतिष्ठा मिळवून दिली तसेच भाजपच पुन्हा सत्तेत का पाहिजे हे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांना पटवून दिले. या निवडणुकीत मंत्री नरेशभाई पटेल सलग दुसर्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत ते 57 हजार 261 मतांनी विजयी झाले होते. या वेळी त्यांच्या विजयाचे मताधिक्क्य तब्बल 93 हजार 166 एवढे आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर व संघटनेचे कौतुक होत आहे.