Breaking News

माथेरानला मुंबईच्या जवळ आणणार -आमदार प्रशांत ठाकूर

निसर्गरम्य वातावरणामध्ये ट्रेक उत्साहात

माथेरान ः बातमीदार
माथेरानला मुंबईच्या जवळ आणण्यासाठी पनवेल हा मुख्य दुवा आहे. माथेरान हे पनवेलपासून हाकेच्या अंतरावर आहे. पर्यटकांना याचा फायदा होऊन लवकरात लवकर ते पनवेलहून माथेरानला कसे पोहचता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे. यामुळे पनवेलमधील काही गावांचा पर्यटन विकाससुद्धा करता येईल, असे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे. ते ट्रेक करत रविवारी (दि. 11) माथेरानमध्ये आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून 18 वर्षाच्या युवकापासून ते 69 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना पर्यावरण ट्रेकचा आनंद देत आमदार प्रशांत ठाकूर माथेरानमध्ये दाखल झाले. त्यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पदाधिकारी, कार्यकर्ते, निसर्ग मित्र संस्थेचे प्रतिनिधी होते. पनवेल तालुक्यातील धोदानी ते माथेरान हे डोंगराळ अंतर पार करत 150 लोकांचा चमू माथेरान येथील सनसेट पॉइंटवर दाखल झाला.
माथेरानमध्ये भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, सरचिटणीस राजेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव आदींनी सर्वांचे स्वागत केले.
पनवेलपासून धोदानीपर्यंत पक्का रस्ता असून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची एसटी सेवाही सुरू आहे. धोदानी गावापासून माथेरान हे साडेचार किलोमीटर असून हा रस्ता जर झाला, तर येथील काही गावांचा पर्यटन विकास होऊन आर्थिक प्रगती होईल याचा सारासार विचार करून पनवेल-माथेरान रस्ता तयार करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले. या रस्त्यामुळे पर्यटकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे तसेच याच मार्गावर फिनॅक्युलर रेल्वेचा प्रस्ताव आहे. याकडेसुद्धा लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व सहकार्‍यांना सोबत घेऊन धोदानी ते माथेरान असा पर्यावरणपूरक ट्रेकिंगचा अनुभव घेतला तसेच माथेरानमध्ये सफर केली. सरतेशेवटी दुपारी याचमार्गे ट्रेक करत सर्वांनी परतीचा प्रवास केला.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply