नवी मुंबई : प्रतिनिधी
पनवेल-खारघर मधील ग्रामविकास भवन येथे महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचे व विविध उत्पादनांचे, तसेच लोकपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार उत्पादने ठेवण्यात आली आहेत. 10 मे पासून बीड जिल्ह्यातील महिला बचत गट येथे आपले खाद्यपदार्थ व वस्तू येथे विक्रीसाठी आल्या आहेत. महालक्ष्मी सरस मार्ट असा हा उपक्रम असून यात उत्पादक ते थेट ग्राहक विक्री अशी संधी ग्रामीण भागातील महिलांना देण्यात आली आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नाशिक, पालघर, नंदुरबार व उस्मानाबाद या जिल्ह्यातील महिला बचत गट येऊन गेले आहेत. बीडमधील महिलांनी कलाकुसरीच्या वस्तू व खाद्यपदार्थ येथे आणले आहेत. यात उडदाचे पापड, मसाला पापड, कापडी सजावट केलेल्या पिशव्या, लोकरीने विणलेल्या बांगड्या, बाहुल्या, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले कडधान्य, चिंच, कुरडया, तसेच अस्सल बीडचे लोणचे, बाजरी, रुखवताच्या वस्तू असे विविध स्टॉल येथे लावलेले आहेत. महिला स्वयंसहायता गटांनी ही उत्पादने तयार केली आहेत. सकाळी 8.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असून 20 मे ही अखेरची तारीख असणार आहे.