Breaking News

ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक धास्तावले

खोपोली ः प्रतिनिधी

मागील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग जमू लागले आहेत. ही मान्सूनपूर्व पावसाची चाहूल असल्याने पाऊस आल्यास नुकसान टाळण्यासाठी आंबा बागायतदार, उत्पादकांनी आहे त्या स्थितीत आंबा काढून बाजारात विक्रीसाठी दाखल केल्याने आंब्याची आवक अचानक वाढली आहे, मात्र बाजारात दाखल होत असलेला आंबा पिकण्यासाठी पूर्ण तयार झाला नसल्याने हा आंबा पिकवल्यानंतरही आंबट व तुरट लागत असल्याने आंब्याचा  स्वाद घेण्याच्या आनंदावर विरजण येत आहे. ढगाळ वातावरणाची धास्ती घेऊन आंबा उत्पादकांकडून आहे त्या स्थितीत आंबा काढून बाजारात विक्रीसाठी आणला जात असल्याने मागील दोन दिवसांत कच्च्या व पिकलेल्या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. याचा परिणाम दरांवरही झाला असून मागील आठवड्यात 150 ते 200 रुपये डझनाने मिळणारा अलिबाग हापूस कच्चा आंबा आता 100 ते 130 रुपये डझन व 200 ते 300 रुपये डझनाने विक्री होत आहे. पिकलेला आंबा आता 150 ते 250 प्रतिडझन दराने उपलब्ध होत आहे. मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात दाखल झाल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व शहरात, प्रमुख रस्त्यांवर आंबा उत्पादक व ठोक व्यापारीवर्गाने आंबा विक्रीची दुकाने थाटली आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील सदस्यांना होत आहे. ठोक व्यापार्‍यांकडून दररोज तीन-चार पेट्या घेऊन त्या शहरातील घरोघरी जाऊन विक्री करणार्‍यांची संख्याही वाढली आहे. चार डझनाच्या पेटीमागे सरासरी 50 ते 60 रुपये नफा कमवून हे आदिवासी कुटुंब दररोज चार-पाच पेट्यांची विक्री करून 200 ते 300 रुपये नफा कमवत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आंब्याचा असा आधार मिळत आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply