खोपोली : प्रतिनिधी
पावसाळा सुरू होताच वर्षा सहलीसाठी निघालेल्या दुचाकीस्वार पर्यटकांवर खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना संसर्ग लाटेचा प्रभाव काहीसा ओसरू लागल्यानंतर नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण फिरणार्या दुचाकीस्वारांवर पोलीस दंडात्मक कारवाईदेखील करीत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने मुंबई, नवी मुंबईचे तरुण मोठ्या प्रमाणात खोपोली, खंडाळा, लोणावळा परिसरात वर्षा पर्यटनासाठी येवू लागले आहेत. या तरुणाईला लगाम घालण्यासाठी मुंबई – पुणे महामार्गावरील खालापूर फाटा येथे पोलिसांकडून दुचाकीस्वारांची तपासणी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणार्या दुचाकीस्वारांचा वाहन परवाना, ओळखपत्र तपासण्यात येत असून नियमाचे उल्लंघन होत असल्यास दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. खालापूर फाटा येथे पोलिसांनी मुंबईतल्या दोन तरुणांना तपासणी करता थांबविल्यानंतर एकाने मुंबई पोलीस छपाई असलेला मास्क लावला होता. विनाकारण आणि कागदपत्र नसल्यामुळे पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्यावर त्या तरुणांनी लोणावळा येथील पोलीस अधिकार्याला फोन लावत खालापूर पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत दंडात्मक कारवाई केली.