नवी मुंबई : प्रतिनिधी
सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ उड्डाणपुलावर सहा वाहनांची रविवारी (दि. 12) दुपारी एकमेकांना धडक बसली. सर्वात पुढे असलेल्या कार चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. यात कोणीही गंभीर झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास नेरूळ उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने सुसाट जात असलेल्या कारचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्याच लेनवरून मागून येणार्या कारचालकाने आपला वेग कमी करण्यासाठी गांगरून अचानक ब्रेक दाबला. मात्र या दुसर्या वाहनावर मागून येणार्या वाहनांना अंदाज न आल्याने एकामागोमाग एक अशी सहा वाहने एकमेकांवर आदळली. सर्वात पुढील वाहनचालक आपली चूक आहे हे लक्षात येताच पसार झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नसले तरी यात एकमेकांवर आदळलेल्या उर्वरित वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे काहीकाळ उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती.