केंद्रीय पुरातत्व विभागाकडून प्रवेशद्वाराची डागडुजी
रेवदंडा : प्रतिनिधी
केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पुढाकाराने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या (चौकोनी बुरूज) डागडुजीचे काम सुरू झाल्याने इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
रेवदंडा आगरकोट किल्ला ढासळत असल्याने याकडे इतिहासप्रेमींनी अनेक वेळा केंद्रीय पुरातत्व खात्याचे लक्ष वेधले होते. अखेर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या (चौकोनी बुरूज) दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डागडुजी, तटबंदीची दुरुस्ती, मोडकळीस आलेल्या पायर्यांची दुरुस्ती आदी कामे केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहेत. अलिबागचे सर्वेक्षण सहाय्यक बजरंग ऐलीकर यांचे मार्गदर्शनाखाली डागडुजीचे काम केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माध्यमातून करण्यात येत आहे.
किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व
पोर्तुगिज कप्तान सोज यांनी सन 1528मध्ये आगरकोट किल्ला बांधला, परंतु त्याआधी सन 1516मध्ये कारखान्यासाठी इमारत बांधली तिला चौकोनी बुरूज म्हणतात. या चौकोनी बुरूजाची तटबंदी 1521 ते 1524मध्ये बांधली असा उल्लेख आढळतो.