22 घरांसह 300 एकर शेतीला फटका
अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील शहापूर येथे सोमवारी (दि. 26) पहाटे 3 वाजता उधाणाचे पाणी घरात शिरल्याची घटना घडली. यामुळे 22 घरांसह 300 एकर शेतीला या उधाणाचा तडाखा बसला.
सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शहापूर गावाला उधाणाच्या पाण्याने वेढा दिला. गाढ झोपेत असलेल्या गावकर्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. 22 घरांमध्ये उधाणाचे पाणी शिरले, तर जवळपास 300 एकरचा परिसर उधाणाच्या पाण्याने जलमय झाला. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
खारभूमी विभागाच्या उदासिनतेमुळे गावकर्यांना सातत्याने या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट 2021मध्ये शहापूर गावालगत असलेल्या खारबंदीस्थीला तडे गेले होते. तेव्हापासून खाडीतील उधाणाचे पाणी लगतच्या परीसरात शिरण्यास सुरुवात झाली होती.
ग्रामस्थांनी वेळोवेळी ही बंदिस्ती दुरुस्त करण्याची मागणी केली होती, पण प्रशासनाने तांत्रिक कारणे पुढे करीत मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
खारबंदिस्तीच्या दुरुस्तीसाठी पोहोच रस्ता तयार करणे आवश्यक आहे. या रस्त्यासाठी आवश्यक सामुग्री जेएसडब्लू कंपनीने देण्याची तयारी दाखवली होती. ग्रामस्थांनी रोजगार हमीतून खारबंदीस्तीची दुरुस्ती करण्याची तयारी दाखवली होती, मात्र प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने वर्षभरानंतरही हे काम सुरू होऊ शकलेले नाही.
दरम्यान उधाणामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा कृषी व खारभूमी यांनी संयुक्तपणे गरजेचे आहे, अशी मागणी आत्माराम गोमा पाटील यांनी केली आहे.