Breaking News

सीमाप्रश्नी महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

नागपूर : प्रतिनिधी
कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव मंगळवारी (दि. 27) महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह 865 गावांतील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. सीमा भागातील इंच न् इंच जमीन तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल. सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी कर्नाटक सरकारला समज देण्यात यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरावात म्हटले आहे.
सभागृहातील दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बाके वाजवत एकमताने ठराव संमत केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच सर्व सदस्यांचे आभार मानले. त्याचबरोबर सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांची आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply