Breaking News

माणगावात ‘अवकाळी’चा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून रोज दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत असून, त्यामुळे भाताच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. पावसाची सर्व नक्षत्रे संपल्यानंतर दीपावलीपूर्वी पाऊस जाणे अपेक्षित होते, मात्र यंदा दीपावली संपल्यानंतरही पावसाने माणगाव तालुक्यात आपली बॅटिंग सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दुपारनंतर पाऊस पडत आहे. यंदा तालुक्यातील शेतकर्‍यांनी सुमारे 12250 हेक्टर जमिनीवर जया, रत्ना, कर्जत तीन, कर्जत पाच, सोनम, लोकनात यांसह अनेक भाताच्या पारंपरिक व सुधारित वाणांची लागवड केली होती. भातपीक चांगले तयार झाले होते, मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. त्या वेळी शेतातील पाण्याचा निचरा वेळीच होऊ न शकल्याने भातपीक कुजले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, तर उर्वरित पिकावर अवकाळी पावसाने घाला घातल्याने शेतकरी मेटाकुटीस आला. खरीप हंगामातील भातपिकावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच भाताचा पेंढाही कुजला आहे. त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

सन 2012च्या पशुगणनेनुसार माणगाव तालुक्यात 32000 गुरे असून, भाताचा पेंढाच नसल्याने या गुरांवर आता उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान, माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसीलदार प्रियंका आयरे, तालुका कृषी अधिकारी नवले यांनी तालुक्यातील विविध भागांमधील शेतात जाऊन  पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या भातपिकाचे पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply