Breaking News

बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स

नागपूर ः प्रतिनिधी

कर्मचार्‍याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला आहे.

निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-2016पासून दर महिन्याला 5,336 रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता सदर अधिकार्‍यांना समन्स बजावला. त्यांना येत्या 10 जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होऊन यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे, तसेच या आदेशाचे उल्लंघन झाल्यास दोन्ही अधिकार्‍यांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली. पुढील तारखेपर्यंत समाधानकारक आदेश जारी करून त्याची माहिती याचिकाकर्त्याला देण्यात आल्यास दिल्ली येथील मुख्य व्यवस्थापकांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्रीय वित्त मंत्रालयालादेखील नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. याचिकेतील माहितीनुसार बँक व्यवस्थापनाने याचिकाकर्त्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचे निर्देश दिले नाहीत. असे असताना याचिकाकर्त्याच्या निवृत्ती वेतनातून कशाची कपात केली जात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याचिकाकर्त्याने यासंदर्भात बँकेला निवेदन सादर केले होते, पण त्याची दखल घेतली नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. व्ही. आर. थोटे यांनी कामकाज पाहिले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply