दुबई : वृत्तसंस्था
क्रिकेट विश्वामध्ये भारताचा तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे. आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलवरची पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. आयसीसीच्या या पॅनलमध्ये भारताच्या जीएस लक्ष्मी यांचा समावेश झाला आहे. जीएस लक्ष्मी या आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला आहेत. 51 वर्षांच्या जीएस लक्ष्मी आतापर्यंत स्थानिक महिला क्रिकेटमध्ये 2008-09 पासून मॅच रेफ्रीची भूमिका निभावत आहेत. महिलांच्या तीन वनडे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्येही जीएस लक्ष्मी रेफ्री राहिल्या आहेत. ‘आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलवर नियुक्त होणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. यामुळे माझ्यासाठी नवीन दरवाजे उघडले आहेत. भारतामध्ये एक क्रिकेटपटू आणि मॅच रेफ्री म्हणून माझी कारकीर्द बराच काळ चालली. आता एक खेळाडू आणि मॅच अधिकारी म्हणून मिळालेल्या अनुभवाचा मी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयोग करीन,’ असं लक्ष्मी आयसीसीशी बोलताना म्हणाल्या.