Breaking News

कर्जतमधील पेठ किल्ल्यावर सापडली ब्रिटिशकालीन तोफ

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यामधील कोथळी गड म्हणजेच पेठ किल्ल्यावर ब्रिटिशकालीन तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेली ही तोफ प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे यांनी कोथळीगडावरील एक तोफ गावकर्‍यांच्या माहितीवरून शोधून काढली. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या दुसर्‍या प्रवेशद्वाराच्या 100 फूट खोल अंतरावर भल्यामोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली 4.5 फूट लांबीची तोफ सापडली. त्यानंतर तिला सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी रविवारी (दि. 7) सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तोफेला मातीतून बाहेर काढून दोरखंडाच्या साह्याने 100 फूट वर असलेल्या प्रवेशद्वारापासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवले. जवळपास पाच तास चाललेल्या या मोहिमेमध्ये संस्थेच्या 60 सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवसंजीवनी दिली. गावकर्‍यांनी या मोहिमेमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल श्रमिक गोजमगुंडे यांनी गावकर्‍यांचे आभार मानले, तसेच पुरातत्त्व विभागाचेदेखील आभार व्यक्त केले. दरम्यान, लवकरच या तोफेला तिचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागामार्फत तोफगाडा बसविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply