Breaking News

कर्जत रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी धोकादायक

पादचारी पूलाचा एक भाग बंद : पोलिसांचा कडक बंदोबस्त

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे बाजूकडील पादचारी पुलाचा एक भाग 20 डिसेंबरपासून बंद आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमधून कर्जत स्थानकात पोहचलेल्या प्रवाशांना रुळ ओलांडून जाण्याची वेळ आली आहे. प्रवाशी फ्लाट दोनमधून फ्लाट एक वर जाण्यासाठी प्रवासी उड्या मारून जात असल्याने रेल्वे स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्जत रेल्वे स्थानकातील पुलाचा फ्लाट दोन आणि एक यांना जोडणारा भाग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलने कर्जत स्थानकात उतरणार्‍या शेकडो प्रवाशांना मुंबई बाजूकडे असलेल्या पादचारी पुलाचा वापर करावा असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

या स्थानकात सर्वात जास्त प्रवासी हे पुणे बाजूकडील पादचारी पुलाचा वापर करून कर्जत मुख्य शहरात पोहचत होते. मात्र पादचारी पुल बंद असल्याने प्रवासी उपनगरीय लोकलने कर्जत स्थानकात उतरल्यानंतर दोन नंबर फ्लाटवरून रुळावर उतरून फ्लाट एक वर जात आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणाला फ्लाट दोन वरून उडी मारताना पायाला गंभीर दुखापत होण्याची घटना घडली आहे. तर उपनगरीय लोकल आल्यानंतर शेकडो प्रवासी कर्जत स्थानकात उतरून कर्जत शहरात जाण्यासाठी रुळ ओलांडून जात आहेत. रुळ ओलांडून प्रवास करणे धोकादायक आहे अशी सूचना सतत केली जात आहे. पण पादचारी पूल बंद असल्याने प्रवासी जवळचा मार्ग म्हणून ओलांडून जातात. त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

फ्लाट एक आणि दोन मध्ये चार रेल्वे मार्गिका आहेत आणि त्या ओलांडताना पुणे येथे मुंबईकडे जाणार्‍या एक्स्प्रेस गाड्या वेगाने जातात.  हे लक्षात घेता प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत रेल्वे स्थानकात प्रवासी रुळ ओलांडत असलेल्या ठिकाणी रेल्वे पोलीस, रेल सुरक्षा दल आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त 24 तास तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकात दोन्ही फलाटावर रुळ ओलांडून प्रवासी जावू नयेत. यासाठी दिवसभर पोलिसांच्या शिट्यांचा आवाज घुमत आहे. रेल्वेकडून ठेवण्यात येत असलेला बंदोबस्त यामुळे रुळ ओलांडून जाणार्‍या प्रवाशांची संख्या कमी होईल. अशी अपेक्षा आहे.

’रेल्वे अधिनियमानुसार रेल्वे क्रॉसिंग करणे गुन्हा असून रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे हे पादचारी पूल बंद आहे. रेल्वे प्रवाशांची गैरसोय जरी होत असली तरी नागरिकांच्या चांगल्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.’ -संभाजी यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्जत रेल्वे पोलीस

ब्रिजचे काम जलदगतीने करण्यात यावे जेणेकरून लोकांना रेल्वे क्रॉसिंग करायला लागणार नाही. आत्ताच्या कामाची गती बघता हे काम लवकर पूर्ण होईल असे दिसत नाही तरी प्रशासनाने यामध्ये त्वरित लक्ष घालावे.’ -सुमेश शेट्ये, प्रवासी

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply