Breaking News

खालापुरातील कॅम्प मॅक्स हॉटेलवर हातोडा

वनखात्याच्या अडीच एकर जागेवर होते अतिक्रमण

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

वनविभागाच्या जागेवर आलिशान हॉटेल थाटून खोर्‍याने पैसे ओढणार्‍या कलोते (ता. खालापूर) येथील कॅम्प मॅक्स हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामावर शनिवारी (दि. 2) वनविभागाने बुलडोझर फिरवला.

खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण परिसरात धनिकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. याठिकाणी फार्महाऊस आणि हॉटेल व्यवसाय जोमात असून अनेकांनी वन आणि पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. कॅम्प मॅक्स हॉटेलचा मालक जगमितसिंग उषपालसिंग सबरवाल याने वनविभागाच्या जवळपास 1.09.16 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केले होते. त्याठिकाणी बांबूची 22 घरे, रेस्टॉरंट बार, पॅगोडा, स्वयंपाक घर, टेबल टेनिस कोर्ट, लॉन, ओपन थेटर, पक्षी घर बांधले होते. वनविभागाने वारंवार नोटीस देवूनसुद्धा हॉटेल मालक सबरवाल जुमानत नव्हता. अखेरीस वनविभागाने सबरवाल विरोधात गुन्हा दाखल केला होता. मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सबरवाल याला मुदत देण्यात आली होती, परंतु कोणतेही पुरावे तो सादर करु शकला नाही. त्यामुळे सात दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हॉटेल मालकाने सात दिवस उलटूनसुद्धा अतिक्रमण न हटविल्याने शनिवारी वनविभाग जय्यत तयारीने कलोते येथील कॅम्प मॅक्स हॉटेलवर धडकले. शंभर जणांच्या पथकाने बुलडोझरसह पोलीस बंदोबस्तात कारवाई करून हॉटेल पाडले.

पाटबंधारे विभागाच्या जागेतही अतिक्रमण

कॅम्प मॅक्स हॉटेल मालकाने पाटबंधारे विभागाच्या जागेतसुद्धा अतिक्रमण केले आहे. याशिवाय धरणात बेकायदेशीरपणे बोटींग चालते. ऑगस्ट 2021मध्ये पोलिसांनी येथील हुक्का पार्टीवर धाड टाकली होती. आता वनविभागाने केलेल्या कारवाईनंतर पाटबंधारे विभागाला जाग येते का हे पाहवे लागेल.

प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 53,54,237 प्रमाणे चौकशी करून कारवाई केली आहे.

-राजेंद्र पवार, वनक्षेत्रपाल,  खालापूर

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply