Breaking News

आयएनएस ‘विक्रांत’ची मंत्रालयात प्रतिकृती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई ः रामप्रहर वृत्त

नौदल बाहुबली, देशाची सामरिक ताकद वाढविणारी आणि शत्रूच्या उरात धडकी भरणार्‍या आयएनएस विक्रांत युद्धनौकेची माहिती सर्वांना अवगत व्हावी यासाठी तिची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्कार भारती कोकण प्रांत, ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वांत मोठी युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन मुंबई येथे 13 ते 20 जानेवारीपर्यंत भरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयाच्या नवीन इमारतीत त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि संस्कार भारतीचे केंद्रीय संरक्षक राजदत्त, राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत, ज्येष्ठ कलाकार व संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय शिरसाट, ओरायन मॉलचे मालक मंगेश परूळेकर, नेव्ही फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी कमांडर विजय वडेरा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्कार भारतीचे महामंत्री अ‍ॅड. अमित चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. देशाची पहिली स्वदेशी आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणारी आहे. ती नौदलाच्या लढाऊ ताफ्यात दाखल झाली आहे. तिची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मंत्रालयात महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून लोकं विविध कामाच्या अनुषंगाने येत असतात आणि वर्षभर त्या ठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या मंत्रालयात पनवेलमध्ये जन्म झालेली आयएनएस विक्रांत जहाजाची प्रतिकृती प्रदर्शनाच्या रूपाने मांडण्यात आली आहे. या उपक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले आणि या प्रदर्शनातून आयएनएस विक्रांत युद्धनौकेची महती सर्वदूर पोहचेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply