Breaking News

कांगोरीगडावर पर्यटनपूरक विकासकामांचा अभाव

महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड चंद्रराव मोरे यांच्याकडून हा कांगोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि याचे नामकरण ’मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छ.शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छ. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला; तेव्हा तेथील धनसंपत्ती प्रथम कांगोरीगड येथे हलवून त्यानंतर पन्हाळा किल्ल्यावर नेले. इ.स.1817 या मध्ये सरदार बापू गोखले यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रजांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. इ.स 1818 मध्ये कर्नल प्रॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला. तत्पूर्वी रायगड किल्ल्यावर ब्रिटीशांनी युनियन जॅक फडविण्यासाठी पुकारलेल्या युध्दात रायगडालगतच्या किल्ल्यांपैकी कांगोरीगड हा प्रतापगडासोबतच लढाईला उतरला. मात्र, रायगडाचा निसटलेला ताबा पुन्हा घेता आला नाही. पोलादपूर गावातील चोळई व सावित्री नदीच्या संगमावर मराठयांची इंग्रजांविरूध्दची लढाई झाली तेव्हा लेफ्टनंट कर्नल क्रॉसवीच्या हत्यारबंद सैन्यासोबत तुंबळ युध्द झाले. ही इंग्रजांविरूध्दची शेवटची लढाई पोलादपूरमध्येच झाल्याचे इतिहास सांगतो. मात्र, आता या इतिहासाला सरकारदरबारी पर्यटनस्थळाचा दर्जा मिळू लागला असून रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागांमार्फत ज्या रायगड जिल्हा पर्यटन विकास कामे करण्यासंदर्भात पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये कांगोरीगडाचा उल्लेख ’क’ दर्जाचे पर्यटनक्षेत्र असा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप येथे पर्यटनास प्रोत्साहन देणार्‍या विकासकामांचा अभाव कायम आहे.

पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी 6 तास लागतात. एकाच मोहिमेत चंद्रगड आणि कांगोरीगडावर चढाई करायची असल्यास गिर्यारोहक हा मार्ग अवलंबतात. वरंध घाटातील माझेरी या गावातून 6 तासांचे अंतर आहे. कांगोरीगडाकडे जाणार्‍या गुराखी सांगू शकतील अशा ढोरवाटा असंख्य आहेत. मात्र, प्रत्यक्षात या सर्व एकाच ठिकाणी साधारणत: येऊन गडाकडे जाण्याची एकच वाट दिसते. स्थानिक नवरा-नवरीचे सुळके म्हणतात अशा नैसर्गिक ट्वीन टॉवरप्रमाणे सुळक्यांच्या खालून गडावर जाण्याची एकमेव वाट जाते. हा सुळका नजरेच्या टप्प्यात ठेवला तर गिर्यारोहकांसाठी  कुठूनही वाट शोधून गडावर चढाई करता येईल. पिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट ही प्रसिध्द मळवाट आहे आणि आता तिकडून गडावर जाण्यासाठी अर्धा रस्तासुध्दा बांधला असला तरी साहसाची आवड असणार्‍या तरुण साहजिकच सडे या गावातून चढाई करतात. केवळ दोन तासांत शर्थीचे प्रयत्न केल्यास चढाई पूर्ण होते.

महाडपासून दीड तास अंतरावरील पिंपळवाडी इथून जवळ-जवळ कांगोरीगडाच्या अर्ध्यापर्यंत चारचाकी वाहन जाऊ शकेल असा कच्चा रस्ता अलिकडेच आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आला आहे तर दुसरा रस्ता हा पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे 24-25 किलोमीटर अंतर असलेल्या सडे या गावातून आहे. सडे गावाच्या पुढे काही अंतरावर वडघर गावातून सुध्दा गडावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. सरळ-सोट वाढलेले मजबूत बुंध्यांचे मोठ-मोठाले वृक्ष आणि त्यांना गच्च लपेटलेल्या गर्द घनदाट वेलींनी त्या पायवाटेवर मंडप तयार केलेला दिसतो. त्या झाडा-झुडूपांतून बाहेर आल्यानंतर काळा कातळ जो अगदी सरळ रायगडाच्या टकमक टोकासारखा दिसू लागतो. येथेच असलेले प्रवेशद्वार भग्नावस्थेत आहे केवळ शेजारील विटांचे गोलाकार बांधकाम बघून तेथे असलेल्या प्रवेशद्वाराची कल्पना येते. तिथून पुढे आल्यावर डाव्या हाताला निमुळती होत असलेली माची आणि उजव्या हाताला बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट दिसते.

उजव्या हाताला कातळात खोदलेले पाण्याचे दोन टाके आहेत तर समोर कांगुरीनाथाचे मंदिर आहे.गाभार्‍यात कांगुरीनाथासह काळभैरव,शिवलिंग यांचे पाषाण आणि घोडयाच्या 5 मुर्त्या तसेच इतर दोन मुर्त्या आहेत.बाहेरील सभामंडपात आणखी काही भग्नावस्थेतील पाषाण आहेत.स्थानिक लोक येथे येऊन देवाला राखण म्हणजेच बळीही देतात. या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माचीवरून नयनरम्य दृश्य दिसते.माचीला जवळ-जवळ अर्धा किलोमीटर आणि 20-30 फुट उंच तटबंदी आहे. यावरून ढवळी व कामथी नद्यांचे खोरे पूर्ण दृष्टीपथात येतात. कांगोरीगडावरील पाण्याच्या दोन टाके आहेत. उजव्या हाताला अत्यंत निमुळती असणार्‍या पायवाटेवरून बालेकिल्ल्याकडे जाता येते.साधारणत: 50मीटर अंतरावर गडावरील सर्वात मोठे टाके आहे. त्यातील पाणी बरे स्वच्छ पिण्यायोग्यही आहे. गडावरील या टाक्यात बारमाही पाणी असते. बालेकिल्ल्यावर तीन भग्न वाडे आहेत. सुरुवातीला नुसता जोता असून त्याच्यापुढे दोन शिवलिंग पाषाणात घडवलेली आहेत. त्यापुढील दोन वाडयांच्या भिंती दोन पुरुष उंच असून त्यांना एकच खिडकी असल्याने त्यांचा वापर कैदी डांबण्यासाठी होत असावा असा अंदाज करता येतो. या वाडयांच्या मागे जाणारी वाट तटापर्यंत जाते. तटावरून खाली पाहिल्यास आलेल्या वाटेचा अंदाज येऊ शकतो. हा तट 20-30 फुट उंच बांधला आहे.

गडावरची माती भुसभुशीत ’गांडूळकी’ची माती असल्याने प्रत्येक पाऊल सावधपणे ठेवावे लागते. ही माती अत्यंत सुपीक असल्यामुळे एकवेळ पाऊस पडला तरी गवत गुडघाभर उंच वाढते.कांगोरीगडावर झाडे खूप

आहेत. कडीपत्ता आणि काटेरी वांग्याची झाडे दिसून येतात.

पोलादपूर तालुक्यातील हा कांगोरीगड म्हणजेच मंगळगड किल्ला आजही रस्ते वाटांअभावी दूर्गम ठरत असून पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागांमार्फत ज्या रायगड जिल्हा पर्यटन विकास कामे करण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार केवळ पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसंदर्भात उल्लेख असला तरी कांगोरीगडावर जाण्यासाठी पायवाट पायर्‍या, वीजपुरवठा, संरक्षक कठडे, गडस्वच्छता आदी पर्यटकांना रहदारी वाढण्यास उपयुक्त विकासकामांचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवतो.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply