पनवेल : बातमीदार
पनवेल येथे अक्षर मानवचे राज्य संगीत विभाग प्रमुख वेदांग धाराशीवे यांची संगीत मैफल रविवार (दि. 12) सिडको गार्डन, सेक्टर 11, नवीन पनवेल येथे रंगली.
सिडको बगीच्यातल्या खुल्या रंगमंचावर वेदांग धाराशीवे यांनी राग यमनमधली बंदीश सादर केली. या वेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी तराणा, जोग या रागातल्या बंदिश सादर करत असताना संगीताविषयी गप्पा मारल्या. मंगेश पाडगावकर यांच्या दोन गजला सादर केल्या. ‘तोच चंद्रमा नभात’ हे भावगीत सादर केले आणि श्रोत्यांना मैफलीचा आनंद मिळाला. शेवटी भैरवी सादर करताना श्रोत्यांना हुरहूर वाटली. ही मैफल कधीच संपू नये असे वाटले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅड. पूर्णिमा सुतार यांनी प्रास्ताविक केले, तर अक्षर मानवचा परिचय आणि पाहुण्यांचा परिचय व स्वागत अक्षर मानवचे राज्य ग्रंथालय विभागप्रमुख आणि रायगड जिल्हाध्यक्ष रोहिदास कवळे यांनी केले, तर माधव भागवत (तबला) आणि प्रतिमा कुलकर्णी (हार्मोनियम) यांचे स्वागत पनवेल तालुकाध्यक्ष प्राजक्ता कवळे यांनी अक्षर मानव प्रकाशनची पुस्तकं सप्रेम भेट देऊन केले. आभार रोहिदास कवळे यांनी मानले. या वेळी गुणवंत पाटील, युक्ता पवार आदी अक्षर मानवचे सदस्य आवर्जून उपस्थित होते.