Breaking News

पनवेलमध्ये संजय गांधी निराधार योजना समिती गठीत

एकूण 53 प्रकरणे मंजूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 20) तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत 49 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली, तर केंद्र पुरस्कृत, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 4 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून एकूण 53 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.

बैठकीला संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष दर्शन ठाकूर, शासकीय सदस्य सचिव तथा तहसीलदार विजय तळेकर, शासकीय सदस्य, पं. स. गटविकास अधिकारी संजय भोये आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

या प्रकरणांमध्ये दर प्रति महिना रक्कम रू. 1000 ते 1200 मिळून एकूण रक्कम रू. 52,400 तसेच केंद्र पुरस्कृत, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना एकूण 4 प्रकरणे 80,000  रू. असे एकूण 1,32,400 रू. इतके अनुदान लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

या वेळी तहसीलदार विजय तळेकर यांनी, या मोहिमेत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देताना काही अपात्र लाभार्थी देखील असतात त्यांची शोधमोहीम हाती घेत आहोत. यामध्ये ग्रामसेवकांच्या मार्फत ग्रामसभेमध्ये या याद्यांचे वाचन केले जाणार असून ग्रामसभेमार्फत अपात्र लाभार्थी ठरवून त्यांचा लाभ कमी करणार आहोत. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना या योजनेच्या कार्यकक्षेत आणायचे आहे, असे सांगितले.

संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष दर्शन ठाकूर यांनी सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागातून तसेच संपूर्ण पनवेल तालुक्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून गरीब व गरजू लोकांना याचा लाभ मिळेल याकडे लक्ष केंद्रित केले जाईल.

संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार नाईक यांनी योजनेबाबतचे निकष कोणते आहेत हे सगळ्यांना समजावून सांगितले.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply