Breaking News

नागरिकांच्या आरोग्याचा खेळ थांबणार

खालापूर मुंगुर तलावाबाबत अप्परजिल्हा दंडाधिकार्‍यांचे कारवाईचे आदेश

खोपोली : प्रतिनिधी

तालुक्यातील मुंगुर मासे तलावावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार्‍या शिवलिंग अशोक वाघरे यांच्याकडे अखेर प्रशासनाचे लक्ष गेले असून अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग रायगड आणि पोलीस अधीक्षक रायगड यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार मुंगुर प्रजनन, मत्स्यपालन, वाहतुक व विक्री करण्यावर बंदी घातली असून प्रतिबंधित मागूर माशांचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश असताना देखील खालापूर तालुक्यात महड, कुंभिवली, चौक हद्दीत कोपरी गाव, पौध, माजगाव, मोहपाडा आणि खालापूर येथे मोठ्या प्रमाणात नदी किनारी तलाव राजरोस सुरू आहेत. . पाताळगंगा नदिलगत हे तलाव असून मोठ्या प्रमाणात मुंगूर माशाची पैदास केली जाते. नदिकिनारी असलेल्या या तलावातील पाणी गटारातील पाण्यापेक्षा घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे. सडलेले खाद्य मुंगूर माशाना खायला दिले जाते. दुर्गंधीने सर्व परिसर भरून जातो. तलावातील घाण पाणी नदिपात्रात सोडली जात असल्याने पाताळगंगा प्रदूषित होत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची योजना पातळगंगा नदीवर कार्यान्वित आहेत त्यामुळे शेकडो कुटुंबांना दूषित पाणी प्यावे लागत आहे . खालापूर नगरपंचायतची पेयजल योजना पडली आहे. खालापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवलिंग वाघरे यांनी याबाबत गटविकास अधिकारी, तहसील कार्यालय,  सहाय्यक मत्स्य आयुक्त त्यांच्याकडे पाठपुरा करून देखील प्रशासन टोलवाटोलवी करत कारवाई करत नव्हते. अखेरीस त्यांच्या या लढ्याची दखल अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे यांनी घेतली असून रायगड पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग रायगड यांना शिवलिंग वाघरे यांच्या तक्रारीची चौकशी करून त्यावर कारवाईबाबत आदेश दिले असून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा सुरू असलेला खेळ थांबेल अशी आशा व्यक्त होत आहे.

बंदी असताना देखील मुंगुर तलावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये सहभागी तलाव मालक तसेच स्थानिक त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे.

-शिवलिंग वाघरे, सामाजिक कार्यकर्ते खालापूर

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply