समर्थक आक्रमक; कृषिवल वृत्तपत्र जाळून निषेध
अलिबाग, धाटाव : प्रतिनिधी
अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रकाशीत करुन शेकापचे मुखपत्र असलेल्या कृषिवल वृत्तपत्राविरोधात जिल्ह्यात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग व रोह्यात शुक्रवारी (दि. 20) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये तर रोह्यात तालुकाध्यक्ष अॅड. मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या वृत्तपत्राची होळी करीत निषेध व्यक्त केला. अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि अशा प्रकारे चुकीचे आणि समाजाची दिशाभूळ करणारे वृत्त पसरविणार्यांचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. रोहा येथेही दै. कृषीवल वृत्तपत्राचा निषेध करण्यात आला. कृषीवलच्या वेबपोर्टलला ’आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आमदारकीचा राजीनामा’ या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. काही वेळातच हे वृत्त सोशल मिडियावर प्रचंढ व्हायरल झाले. याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख रार्जा केणी यांनी सांगितले की, अशा प्रकारे अलिबागच्या आमदारांनी राजीनामा दिलेला नाही, हे वृत्त चुकीचे आहे, कोणताही पुरावा नसताना खोटे वृत्त प्रकाशित करण्यात आलेले आहे. शेकापच्या नेत्यांकडे असे खोटे वृत्त प्रकाशीत करण्याचेच काम शिल्लक राहिल्याचे म्हणत यापुढे शेकापने पुन्हा खोटारडेपणा केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा राजा केणी यांनी दिला आहे. थोड्या वेळात हे वृत्त वेबपोर्टलवरून काढण्यात आले. रोहा तालुकाध्यक्ष अॅड. मनोज कुमार शिंदे यांनी, गेल्या अडीच वर्षात आमदार महेंद्र दळवी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः अलिबाग-मुरूड मतदारसंघामध्ये विकासाची कामे केल्यामुळे लोक प्रेरित होऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अशा खोट्या बातम्या कृषीवल पेपर पसरवीत आहेत. त्या बातम्या थांबाव्यात, नाही तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. या वेळी उपतालुका प्रमुख संदेश मोरे, जेष्ठ सल्लागार मोतीराम गिजे, सुधाकर शिंदे, धाटाव विभागप्रमुख रविराज मोरे, चणेरा विभागप्रमुख विकास पाटील, भातसई विभागप्रमुख मदन गिजे, भालगाव विभागप्रमुख समीर घोसाळकर, निडीतर्फे अष्टमी सरपंच स्वामिनी डोलकर, उपविभाग प्रमुख नयन जोशी, शैलेश सकपाळ, समीर सातपुते, उपशहर प्रमुख मुबीन रोहेकर, योगेश डाखवे, शाखाप्रमुख विशेष डोलकर, सतेज शिंदे, निखिल पाटील यासह शिंदे गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.