Breaking News

माणकुले सरपंचपदी भाजपच्या सुजीत गावंड यांची पुन्हा निवड

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील माणकुले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपचे सुजित जनार्दन गावंड विराजमान झाले आहेत. गैरकारभाराचा ठपका ठेवत त्यांचे सरपंचपद कोकण विभागीय आयुक्तांनी रद्दबातल ठरवले होते. परंतु ग्रामविकास मंत्र्यांनी कोकण आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवल्याने गावंड पुन्हा सरपंच झाले आहेत. मे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत गावंड सरपंच म्हणून निवडून आले होते. कारभार सुरू असतानाच विरोधकांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यास सुरूवात केली. त्यांच्या कारकिर्दीत गैरकारभार होत असल्याच्या तक्रारी आल्या. माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्या. त्याआधारे कोकण आयुक्तांनी त्यांचे सरपंचपद रद्दबातल ठरवले होते. या निर्णयाविरोधात सुजित गावंड यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दाद मागितली. त्यात त्यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली. महाजन यांनी याची दखल घेवून कोकण आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवत सुजित गावंड यांना पुन्हा सरपंचपदी बसवण्याचा निर्णय दिला. सुजित गावंड यांनी नुकताच सरपंचपदाचा पदभार स्वीकारला आहे. सरपंचपदी बसल्यापासून विरोधकांनी आपल्याला त्रास द्यायला सुरूवात केली. त्यांच्या अडथळ्यांमुळे गावची विकासकामे रखडली होती. आता पुन्हा जोमाने या कामांना सुरूवात करणार असल्याचे गावंड यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे आलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, उपाध्यक्ष निखील चव्हाण, सुनिल थळे, अनिल थळे. रामनाथ पाटील, राकेश पाटील, सदस्या पाटील, सुदेष्णा थळे, रविंद्र  पाटील, पांडुरंग पाटील, सदानंद पाटील, विवेक गावंड, प्रमोद थळे, सुकन्या पाटील, जिवन म्हात्रे, कैलास पाटील, महेंद्र म्हात्रे, मारुती पाटील, संकेत गावंड, संदीप गावंड, भाजप किसान मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, जयवंत म्हात्रे, दिनेश पाटील, विजय पाटील, निशिकांत म्हात्रे, सचिन पाटील, शशिकला पाटील, पुरूषोत्तम पाटील, प्रकाश धुमाळ या सर्वानी सरपंच सुजित गावंड यांचे अभिनंदन केले.

 

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply