Breaking News

परदेशी रानमोडीचा उपद्रव वाढला

जैवविविधता धोक्यात, निसर्ग अभ्यासकांची चिंता वाढली

पाली : प्रतिनिधी

पाली सुधागड़सह रायगड जिल्ह्यातील कोणत्याही डोंगरमाथ्यावर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला अथवा शहर आणि गावातही बारीक पांढर्‍या फुलांनी भरलेली दाट हिरवी झुडपे पाहायला मिळतात. रानमोडी म्हणून परिचित असलेली ही वनस्पती तिच्या नावाप्रमाणे रानमोडत आहे. झपाट्याने वाढणारी ही परदेशी वनस्पती पूर्णतः निरोपयोगी असून अन्य स्थानिक झाडे आणि गवताच्या वाढीसाठी अडथळा ठरत आहे. शिवाय जैवविविधतेला त्यामुळे धोका असल्याने पर्यावरणप्रेमी व निसर्ग अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील 10 ते 15 वर्षांत या रानमोडीने संपूर्ण रायगड जिल्ह्याचे बहुतांश क्षेत्र व्यापले आहे. तिचे परागकण व बारीक पाकळ्या मोठ्या प्रमाणावर हवेत पसरत असल्याने अनेकांना श्वसनाचा त्रास देखील होतो. तिचा उपद्रव वाढला आहे.पावसाळा संपल्यानंतर अनेक झुडपे आणि विविध प्रकारचे गवताची वाढ थांबते किंवा त्या मरण पावतात. परंतु रानमोडीची दाट हिरवाई फेब्रुवारी महिन्यापर्यंत कायम राहते. पांढर्‍या रंगाची बारीक फुले त्यावर उमललेली असल्याने ती सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अनेकांना हा निसर्गाचा चमत्कार वाटत असला तरी त्याचे दुष्परिणाम मोठे आहेत. ते अनेकांना ही माहित नाही. पर्यावरण अभ्यासक प्रवीण कवळे यांच्यासह अनेक निसर्ग अभ्यासकांनी त्याला दुजोरा दिला आहे.

दुष्परिणाम : रानमोडीमुळे स्थानिक गवताच्या प्रजाती आणि इतर पावसाळी आढळणार्‍या वनस्पती यांच्या वाढीवर मर्यादा येत आहे. या वनस्पतीचा पशुपक्षी प्राणी वगैरे ना तसा काहीच उपयोग नाही. उग्र वास असलेली ही वनस्पती असून तिच्या झुडपातून गेल्यास अंगाला उग्र वास व खाज देखील येते. त्यामुळे तिचे समूळ उच्चाटन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अशी आहे रानमोडी : रानमोडी ही मूळची अमेरिकन झुडूपवर्गीय सूर्यफूल कुळातील वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव क्रोमोलेनिया ओडेरेटा (उहीेोश्ररपशर ेवरीरींर) असे आहे. रानमोडी दीड ते दोन मीटर उंच वाढते तिला 96 हजार ते एक लाख साठ हजारांपेक्षा अधिक बिया येतात. त्या हवेद्वारे वातावरणात पसरतात आणि पावसाळ्यात रुजतात. मुळाद्वारे देखील तिचा प्रसार होतो.

याच्या स्पर्शाने अंगाला खाज येते म्हणून रानमोडी काढण्यासाठी मजूर तयार होत नाही. रानमोडीच्या उच्चाटनासाठी शासनाने पथदर्शी प्रकल्प हातात घेतला पाहिजे. अन्यथा पश्चिम घाटवर विपरीत परिणाम कोणीही थांबवू शकत नाही. रानमोडीमुळे इतर झाडांच्या वाढीला आळा बसतो. तर छोटी स्थानिक झाडे व झुडपे आणि गवत यांना पोषकद्रव्ये व पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांची वाढ खुंटते. अत्यंत निरुपयोगी असलेली ही वनस्पती गुरे देखील खात नाहीत. तर मधमाशा, भुंगे, पक्षी, फुलपाखरू व कीटक यांना याचा काही उपयोग होत नाही. परिणामी या झुडपांच्या बेसुमार वाढीमुळे जैवविविधता आणि पर्यावरण धोक्यात येत आहे.

-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन अलिबाग

मागील दहा-पंधरा वर्षात रानमोडीने संपूर्ण रायगड जिल्हा व्यापून टाकला आहे. ती नावाप्रमाणेच दुर्गंधीयुक्त आहे. स्थानिक वनस्पती नसल्यामुळे तिला नैसर्गिक शत्रू असे कोणी नाही. हिचे उच्चाटन करणे आवश्यक आहे. यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत असे ऐकिवात नाही. रानमोडीचे उच्चाटन करणे म्हणजे ती फुलो-याला येण्याअगोदर मुळासकट काढावी लागेल. आणि तिची व्याप्ती बघता ते अत्यंत अवघड वाटते.

-अमित निंबाळकर, वनस्पती तज्ञ, पाली सुधागड

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply