मोहोपाडा : प्रतिनिधी
पेहचान प्रोजेक्ट इदेमित्सु ल्युब प्रा. लि. व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली येथे टेलरिंग प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण सरपंच रिया कोंडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबाबत देवदास झेंडे यांनी टेलरिंग या व्यवसायातून महिलांनी आपल्या जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. याकरिता पेहचान प्रोजेक्ट व इदेमित्सु व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी काम करीत आहे. जांभिवलीतील सर्व महिलांनी शिवणकामाचे चांगले शिक्षण घेतले आहे. त्याचा चांगला वापर करून घ्यावा, असे आवाहन झेंडे यांनी केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य जान्हवी कोंडिलकर व प्रार्थना देशमुख व पूनम कोंडिलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार ज्योस्ना देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवदास झेंडे यांनी परिश्रम घेतले.