Breaking News

सिडकोच्या एमडींनीकडून नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. संजय मुखर्जी यांनी शुक्रवारी (दि. 1) नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रकल्पाशी संबंधित कामांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकार्‍यांशी प्रकल्पाची अंमलबजवाणी आणि येत असलेल्या अडचणीं संदर्भात चर्चा केली.

मुंबईतील भाऊचा धक्का, नवी मुंबईतील नेरूळ आणि अलिबाग जवळील मांडवा येथे अनुक्रमे मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिडको आणि महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जलवाहतूकीकरिता पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. यानुसार सिडकोकडून नेरूळ येथे जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. जलवाहतूक टर्मिनल हे एनआरआय संकुलाच्या पूर्वेस, नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पश्चिमेस असून उत्तरेकडून पाम बीच मार्गाद्वारे त्यास संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनलचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर स्पीड बोट/कॅटमरान सेवेचे परिचालन महाराष्ट्र सागरी मंडळाकडून करण्यात येणार आहे.

जल वाहतूक टर्मिनल हे पनवेल खाडीमध्ये स्थूणाधारित फलाटावर (पाईल्ड् प्लॅटफॉर्म) उभारणे प्रस्तावित असून विविध सुविधाही पाईल्ड् प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात येणार आहेत. जलवाहतूक टर्मिनलमुळे नेरूळ ते भाऊचा धक्का हे 11 सागरी मैलाचे अंतर स्पीड बोट व कॅटमरानद्वारे केवळ 30 ते 45 मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. तसेच नवी मुंबई, दक्षिण मुंबई व पुढे अलिबाग पर्यंतच्या प्रवासाच्या वेळेतही लक्षणीयरीत्या बचत होणार आहे. जलवाहतूकीमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या रस्ते व रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्येचा भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

पूर्व किनारा जलवाहतूक प्रकल्पांतर्गत नेरूळ प्रवासी जलवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात येत असून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच येथून प्रवाशांकरिता बोट आणि कॅटमरान सेवा सुरू होणार आहे. यामुळे रस्ते व रेल्वे मार्गांवरील ताण कमी होण्याबरोबरच नवी मुंबईकरांना मुंबईला जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

-डॉ. संजय मुखर्जी, एमडी, सिडको

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply