Breaking News

नवी मुंबई मनपा प्रभाग रचना नियमबाह्य; आमदार गणेश नाईक यांचा आरोप

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाह्य पध्दतीने झाली असून त्या विरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येते आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल 2022मध्ये होणे अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी पालिका क्षेत्रात 11 नवीन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकुण प्रभागांची संख्या 111 वरून 122वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री ही नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली. नवीन प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेत आमदार गणेश नाईक यांनी प्रभाग रचना करणार्‍या पालिकेच्या अधिकार्‍यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली या पक्षांना लाभ पोहचविण्यासाठीच प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने केली आहे, असा आरोप केला आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि प्रितनियुक्तीवर आलेले अधिकारी सहभागी आहेत. शहराच्या एकुण लोकसंख्येला एकुण प्रभागांनी भागून जे उत्तर येईल तेवढी सरासरी लोकसंख्या एका प्रभागाची असायला हवी होती, मात्र संबधित अधिकार्‍यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांना लाभ पोहचविण्यासाठी प्रभाग रचनेचे चुकीचे गणित केले आहे. पालिका निवडणुकीच्या संभाव्य प्रभाग रचनेत बेकायदा काम होण्याची शक्यता लोकनेते आमदार नाईक यांनी राज्यपाल, निवडणुक आयोग, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त या सर्वांना अगोदरच वेळोवेळी पत्र पाठवून व्यक्त केली होती. तरीदेखील प्रभाग रचनेमध्ये हेराफेरी झालीच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली, दिघा या भागातील प्रभाग 23 हजार लोकसंख्येचे केले आहेत. त्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रात जास्त प्रभाग झाले आहेत, तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात 30 हजार लोकसंख्येचे प्रभाग केल्याने या विधानसभा क्षेत्रातील प्रभागांची संख्या कमी झाली आहे. 122 प्रभागांपैकी अनेक प्रभागांमध्ये चुकीची रचना करण्यात आली असून याविरोधात कोर्टात दाद मागणार आहे. ज्या ज्या प्रभागात चुकीची प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्या प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असून निष्णात वकीलांची नियुक्ती करणार आहे, असे लोकनेते आमदार नाईक म्हणाले. नवीन प्रभाग रचनेत तीन तीन किलोमिटरचे प्रभाग तयार झाले असून त्यामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होणार आहे. राजकीय फायद्यासाठी नियम डावलून ही प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. पालिकेच्या ज्या अधिकार्‍यांनी राजकीय दबावापोटी चुकीची आणि नियमाबाह्य प्रभाग रचना केली आहे. त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply