महात्मा फुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या शिक्षण प्रणालीत समाज घडविण्याची ताकद आहे. त्याचाच वारसा घेऊन आपण पुढे वाटचाल केली तर लवकरच आपला देश महाशक्ती म्हणून उदयास येऊ शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 3) केले. ते पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमावेळी जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, रायगड विभागाचे निरीक्षक रोहिदास ठाकूर, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. ए. पाटील, डॉ. नरेश मढवी, जिमखाना चेअरमन डॉक्टर प्रफुल्ल वशेणीकर, विद्यार्थी परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील व मनीष पेटकर, सांस्कृतिक विभाग चेअरमन प्रवीण गायकर, कार्यवाह डॉ. पराग पाटील, वाणिज्य विभाग इन्चार्ज डॉ. विलास विशे, कला विभाग इन्चार्ज पोशा ठाकूर, विज्ञान विभाग इन्चार्ज भरत अंबवडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर सेवकवर्ग, पालक विद्यार्थी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारामुळेच आपण घडलो, अशी कृतज्ञता या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली, तसेच महात्मा फुले महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या स्टार कॉलेजच्या दर्जाचे कौतुक करीत महाविद्यालयास उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयास ए+चा दर्जा निश्चित मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, जिद्द, चिकाटी व जाज्वल्य इच्छाशक्ती असेल तर उरी बाळगलेली स्वप्ने साकारता येतात. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचाराचा मागोवा घेत ते म्हणाले की, स्वप्ने अशी पाहावीत की, जी आपणास झोपू देत नाहीत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनीदेखील असेच स्वप्न पाहिले होते ते म्हणजे समाज्याच्या शेवटच्या मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी ते अहोरात्र झटले. त्याचाच परिणाम म्हणून आज रयत शिक्षण संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेला दिसतो आहे.
प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविकपर भाषणामध्ये रयत शिक्षण संस्था व महात्मा फुले महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला, तर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष डॉ. पराग पाटील यांनी महाविद्यालयाच्या सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील ज्या अध्यापक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर, तसेच जिल्हा व विद्यापीठ स्तरावर नैपुण्य प्राप्त केले, त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर व प्रा. शरयू नाईक यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहल ठाकूर हिने मानले.