मुंबई गोवा महामार्ग तीन तास ठप्प
महाड ः प्रतिनिधी
महाड एमआयडीसीत केमिकल घेऊन येणारा टँकर शुक्रवारी (दि. 3) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव हद्दीत उलटला. त्यामुळे महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. तारापूर एमआयडीसीतील लुपिन लिमिटेडमधून महाड एमआयडीसीमधील जेट इन्सुलेशन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यासाठी स्पेनट ऑरगॅनिक सोलव्हेन्ट घेऊन येणारा टँकर (एमएच 04 बीजी 813) शुक्रवारी सकाळी 10 वाजता मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव हद्दीत एका वळणावर उलटला. त्यामुळे टँकरमधील केमिकल रस्त्यावर पसरले.
महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाडचे उपनिरीक्षक प्रवीण धडे, सहाय्यक फौजदार गणेश भिलारे, हवालदार नंदन निजामपूरकर, नाईक अजय मोहित, शिपाई सनील पाटील आणि महाड शहर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचे गांभीर्य पाहता महामार्गावरील वाहतूक बंद केली तसेच महाड अद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल व सेफ्टीचे मार्क कॉर्डिनेटर चंद्रकांत देशमुख, शीतल पाटील, रोहन पाटील यांना पाचारण केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत भरलेला टँकर सुरक्षित बाजूला करीत तीन तासांनी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.