नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्साव आले आहे. दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा थांबा व वेळापत्रक नियोजनाकरीता एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला असून येत्या 15 दिवसांत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा मुहूर्त फेब्रुवारी अखेरपर्यंत लागणार आहे.
ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरुन कल्याण-कर्जतच्या दिशेने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी ऐरोली-कळवा एलिव्हेटेड पूल आणि नवी मुंबईच्या वेशीवर दिघा रेल्वे स्थानक असे दोन प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून एमयुटीपी-3 अंतर्गत उभारण्यात येत आहे. 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. एमआरव्हीसीच्या माध्यमातून 476 कोटी रुपये खर्चून दिघा रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. या स्थानकाचे काम सध्या पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे एमआरव्हीसीने सेंट्रल रेल्वे बोर्डाकडे स्थानकाचे डिझाईन आणि लोकल सुरु करण्यासाठी वेळापत्रक, लोकलचा थांबा याचे नियोजन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे वेळापत्रकाचे अंतिम नियोजन झाल्यानंतर फेब्रुवारी अखेरीस दिघा रेल्वे स्थानक खुले होणार आहे.
भूखंड पार्किंगकरीता देण्याची मागणी
दिघा रेल्वे स्थानकाची उभारणी करत असताना पार्किंगसाठी जमीन उपलब्ध नसल्याचे नियोजन करण्यात आले नव्हते. या ठिकाणी ग्रीनवल्र्ड इमारतीच्या मागील बाजूस एमआयडीसीने वाहनतळासाठी भूखंड आरक्षित ठेवला होता. हा भूखंड पार्किंगकरीता द्यावा, अशी मागणी एमआरव्हीसीने एमआयडीसीकडे केली होती. त्यानुसार या भूखंडाचे आरक्षण बदलून विक्री करण्यात आल्याने पेच निर्माण झाला आहे.
स्थानकाच्या रचनेत बदल
या रेल्वे स्थानकात चार प्लॅटफॉर्म, मुकुंद कंपनीच्या दिशेने उतरण्याकरीता दोन सरकते जिने, दोन्ही दिशेने स्थानकात येणार्यांसाठी भुयारी मार्ग, तिकीट खिडकी ठेवण्यात आली आहे. तर आराखड्यातील रेल्वे स्थानकाच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर काही स्थानकात उंच छत, वाणिज्य वापराच्या इमारती आहेत. परंतु, रेल्वे बोर्डाने या मार्गावरून लोकल सेवा सुरू असल्याने छत टाकण्यास परवानगी नाकारल्याने त्यात बदल करून केवळ प्लॅटफॉर्म छत टाकले आहे.