अलिबाग : जिमाका
पर्यटक व नागरिकांना अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास उपविभागीय अधिकार्यांनी बंदी घातली आहे.
अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरण, उमटे धरण व मुरुड तालुक्यामधील गारंबी धरण व धबधबा, आंबोली धरण, फणसाड धरण, सवतकडा धबधवा व नागशेत या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाण्यास अलिबाग उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत ढगे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत.
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फणसाड व उमटे अशी दोन धरणे आहेत. सध्या पावसाळा सुरु झाल्याने धरणाचे पाणी व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी होवून कोविड विषाणूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबोली व गारंबी धरणे, सवतकडा धबधबा व नागशेत परिसरात मुंबई, ठाणे व पुणे या ठिकाणाहून मोठया प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी, पोहण्यासाठी येत असतात.
सध्या मान्सून कालावधी सुरू असून धरण, धबधबा अथवा तलाव क्षेत्रात मोठया प्रमाणात वर्षा सहलीसाठी पर्यटक एकत्रित येणे, जेवणे, मद्यपान करणे यामुळे मोठ्या प्रमाणावर घाण व कचरा करीत असतात. करोना विषाणूचा संसर्ग हा संपर्कातून होत असल्याने या ठिकाणी नागरिकांना गर्दी होऊन करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आंबोली धरणातील पाणी मुरुड शहर व इतरत्र पिण्यासाठी वापरले जाते. या ठिकाणी येणारे पर्यटक हे नेहमी या धरणाच्या पाण्यात उतरुन तेथील जलप्रदुषण करीत असतात. तसेच मद्यपी पर्यटकांच्याकडून मुली, स्त्रिया यांच्या छेडछाडीचे प्रकार होऊन दखलपात्र, अदखलपात्र गुन्ह्याचे प्रकार घडू शकतात, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अलिबाग विभागात करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पहाता व आगामी करोना विषाणूची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याने पर्यटक व नागरिकांना करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, जीवितहानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून तिनविरा धरण, उमटे धरण व गारंबी धरण व धबधबा, आंबोली धरण, फणसाड धरण, सवतकडा धबधबा व नागशेत या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
हा मनाई आदेश पुढील आदेश होईपर्यंत अथवा जिल्ह्यात लॉकडाऊन असेपर्यंत जारी करण्यात आला आहे, असे उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत ढगे यांनी कळविले आहे.