खोपोली : प्रतिनिधी
वृक्षांच्या बेसुमार तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याचबरोबर पक्ष्यांचे निवासस्थान असलेल्या वृक्षांवर आपण घाव घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पक्ष्यांचे अधिनिवास नष्ट होत चालले आहेत. पूर्वी जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्ष असायचे त्याचबरोबर पक्ष्यांचे मंजुळ स्वरही कानी पडत असत. मात्र मानवानी स्वताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्षांच्या मुळावर घाव घालण्यास सुरुवात केली आणी पक्षांचे मंजुळ स्वर कानी पडण्याचे बंद झाले आहे. वृक्ष वाढण्यासाठी कित्तेक वर्ष लागत असतात. मात्र त्यांची कत्तल करण्यासाठी काही क्षण लागत आहेत. यामुळे वृक्षांवर अधिवास करणार्या घुबड, घार, गिधाडे, मोर, पोपट कावळा, चिमणी, पारवे असे दुर्मिळ पशुपक्ष्यांचे आश्रयस्थाने नष्ट होत चालली आहेत. यामुळे त्याचा अधिवास जपणे ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागात डोंगरामध्ये, रस्त्याच्या बाजूला वड, चिंच, पिंपळाची, आब्यांची पुरातन वृक्ष असायचे परंतु डोंगर तसेच जंगलात वणवे पेटण्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्याची झळ बसून अनेक वृक्ष जळून खाक होत असल्याचे दुर्देवी चित्र आपणास पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी झाडे सुकली आहे. या नावाखाली वृक्षतोड करण्यात येत आहे. रस्त्याची रुंदी वाढवण्याच्या नावाखाली वृक्षांची तोड करण्यात येत आहे. यामुळे या झाडांच्या खोडांमध्ये राहाणार्या पक्ष्यांना आपले घर गमवावे लागत आहे.
निसर्गाचा र्हास
भारतीय संस्कृतीमध्ये घुबडाला महालक्ष्मीचे वाहन म्हटले आहे. मात्र, महालक्ष्मीचे वाहनच सध्या धोक्यात आले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली शुभ-अशुभाच्या चक्रव्यूहात हा पक्षी संकटात सापडले आहे. निसर्गाचा र्हास सुरू झाला आहे. यामुळे सर्व स्थरांतून पक्षी वाचवण्यासाठी संकल्प करण्याची गरज निर्माण झाली आहे.