Breaking News

आग्रा किल्ल्यात यंदा प्रथमच साजरी होणार शिवजयंती

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्त्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले. हा उत्सव साजरा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
उरण येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, पनवेल शहर सरचिटणीस नितीन पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर व प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सांगितले की, मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा येथील किल्ल्याला मोठे महत्त्व आहे. शिवछत्रपतींनी याच किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. हा ’दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती या वर्षी साजरी होत आहे. या निमित्ताने हा मोठा योग महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आग्रा किल्ल्यात साजरा होणे हा समस्त मराठी जनतेच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.
आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. त्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. या कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासन सहआयोजक असेल, तर या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले, त्यानुसार पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्र शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या शिवजयंती उत्सवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पुणे येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे ना. शाह यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply