नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या, तसेच यशस्वी मुलांनी हुरळून न जाता सातत्य कायम टिकवून ठेवले पाहिजे; कारण सातत्य महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या धन शक्ती आणि बलशक्ती पेक्षा ज्ञान महत्वाचे आहे हे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावे, असे सुजाता ढोले यांनी सांगितले. या वेळी माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुजाता ढोले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी तसेच प्रत्येकाने पाच तरी झाडे लावूया आणि संवर्धन करूया, असा मोलाचा संदेश दिला आणि विद्यार्थ्यांना माझी वसुंधराची शपथ दिली. विद्यार्थी याचबरोबर आदर्श शिक्षक पुरस्कार जगन्नाथ कोळी आणि रिफ्लेक्टिव टीचर मनोज मयेकर तसेच आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व शिक्षकांचा सन्मान अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते हस्ते करण्यात आला. पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे, संचालक कृष्णाजी कुलकर्णी, संचालक दिनेश मिसाळ, संस्थेचे सल्लागार तुकाराम दौंडकर, मुख्याध्यापक शिवाजी माळी, मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक, पर्यवेक्षक सुजय वाबळे, अस्मिता सलगर तसेच सर्व पालक प्रतिनिधी व विद्यार्थी कार्यक्रमांस उपस्थित होते.