अलिबाग : प्रतिनिधी
नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्याच्या 14 तालुक्यांमध्ये महाराष्ट्र दिनापासून अर्थात सोमवार (दि.1)पासून हे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात बाह्यरुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलीकन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत तसेच याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषतज्ज्ञ संदर्भसेवा पुरविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यात सुरू होणार्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात देण्यात येणार्या मोफत आरोग्यसेवांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. किरण पाटील व डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील दवाखान्यांची ठिकाणे
सावित्री पर्ल्स बिल्डिंग, ब्राम्हण आळी, अलिबाग; दहिवली, नगर परिषद कर्जत; भानवज बालवाडी, खोपोली; जुनी भाजी मंडई, चवदार तळ्याजवळ महाड; जुने माणगाव, नगरपंचायत माणगाव; साबर बौद्धवाडीजवळ बसस्टँड, नगरपंचायत म्हसळा; दुकान नं. 27, मुरूड, नगर परिषद मुरूड; खारघर सेक्टर 12, पनवेल महापालिका; म्हाडा कॉलनी, नगर परिषद पेण; स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृह नगरपंचायत पोलादपूर; अष्टमी, रोहा नगर परिषद रोहा; जीवना कोळीवाडा, नगर परिषद श्रीवर्धन; तळा-मांदाड रोड, तळा; कोटनाका, नगर परिषद उरण.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …