Breaking News

भिंती संदेशातून स्वच्छ, सुंदर पनवेलचा नारा

पनवेल : नितीन देशमुख
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरातील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगविले जात आहेत. ‘स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल’चा नारा या संदेशांतून नागरिकांपर्यंत पोहचवला जात आहे.
पनवेल महापालिका हद्द स्वच्छ, सुंदर असली पाहिजे यासाठी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे. सध्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 महापालिका कार्यक्षेत्रात शहरात राबविले जात आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीही या अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगविले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने स्वच्छतेचे महत्त्व या चित्र व संदेशांतून पटवून दिले जात आहे.
नागरिकांनी घनकचर्‍याचे ओला आणि सुका वर्गीकरण करावे, प्रगतीशील पनवेल, वारली पेंटिग, माझी वसुंधरा अभियान, वृक्षारोपण करा, खेळाचे महत्त्व, स्वच्छतेचे संदेश, वाहतुकीचे नियम, स्वच्छ पनवेल, भारतीय संस्कृती असे विविध विषयांचे संदेश या भिंती चित्रातून दिले जात आहे.
पनवेल महापालिकेच्या खारघर, कामोठे, कळंबोली पनवेल अशा सर्वच विभागांमध्ये भिंती चित्रांचे काम सुरू आहे. यामध्ये सार्वजनिक भिंती, विविध पुलांच्या भिंती व पुलाच्या खांबाचा खुबीने वापर करण्यात येत आहे. रियुज, रिड्युस, रिसायकल तंत्र, स्वच्छतेची सप्तपदी, नारीशक्तीचा सन्मान अशा विविध संकल्पनांची चित्रे या वर्षी चित्रित करण्यात आली आहेत .
या वर्षी शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने चारही प्रभागांतील महत्त्वाच्या चौकामध्ये रस्त्यांच्या दुभाजकामधील विद्युत खांबांवर आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांनी समाजामध्ये पुढाकार घेऊन कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करीत आहे. यामध्ये एमजीएम, पिल्लई, सरस्वती अशा विविध महाविद्यालयांमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत  कचरा वर्गीकरण आणि सिंगल युज प्लास्टिक या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सोसायटीमधील कचर्‍याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने सोसायटीमधील ओला कचर्‍यापासून खत तयार करण्याच्या विविध कार्यशाळा महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहेत.  शालेय विद्यार्थ्यांना कचर्‍याचे वर्गीकरणाचे महत्त्व कळावे यासाठी कचरा संकलन पासबूक योजना सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत विविध उपाययोजनांमध्ये नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
लोकसहभागातून उपक्रम
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पनवेल महापालिकेस याआधी कचरामुक्त शहरासाठीचे थ्री स्टार व हागणदारीमुक्त शहरासाठीचा ओडीएफ प्लस दर्जा मिळाला आहे. या वेळी आणखी चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करीत आहे. नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी करण्याच्या दृष्टीने महापालिका विविध उपक्रम राबवित आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply