Breaking News

नवी मुंबईतील भूमिपुत्रांचा तीनपट मालमत्ता कर रद्द

आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या सुमारे 5,000 घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता तसेच सदरबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

आमदार मंदा म्हात्रेंच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत नगरविकास विभागाने नवी मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. यामुळे नवी मुंबईतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतचे पत्र नगरविकास विभागाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना पाठवले आहे.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील 29 गावातल्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना नवी मुंबई महानगरपालिकेने तीन पट टॅक्स लावला होता तर रकमेवर 18% व्याज आकारला जात होता.  नवी मुंबईतील अशा 5 हजार घरांना पालिकेमार्फत नोटीसा पाठवल्या गेल्या. आपल्या देशात समान कायदा आहे, असे असताना महापालिका क्षेत्रातील इतर घरांना वेगळा कर व ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वेगळा कर हा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांवर अन्याय आहे. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी नवी मुंबई शहर वसविताना आपल्या 100 टक्के जमिनी दिल्या आहेत. त्यांच्याच स्वतःच्या मालकी जमिनीवर बांधलेल्या घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्याची तसेच त्यावर लावण्यात आलेला 18 टक्के व्याज व दंड माफ करण्याची आवश्यकता होती. त्यावेळी नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते तर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मागणी केली होती.

याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असता तीन पट लावण्यात आलेला मालमत्ता कर रद्द करण्याबाबत नगरविकास विभागाकडून नवी मुंबई महापालिकेला निर्देश देण्यात आले आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply